आपल्याला एखादा आजार झाला की आपण
त्यावरील विविध औषधे घेतो, उपाय करतो; परंतु
मुळाशी जाऊन हा आजार कशामुळे झाला असेल हे
जाणून घेत नाही. आपल्याला होणार्या अनेक
आजारांचे मूळ हे आपल्या अस्वच्छ हातांमध्ये
असते. अशुद्ध, अस्वच्छ हातांनी अन्नपदार्थ
हाताळल्यामुळे, खाल्ल्यामुळे अनेक जीवाणू आपल्या
पोटात जात असतात आणि त्यातून विविध
प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळत असते.
म्हणूनच हस्तशुद्धीबाबत जागृती करण्यासाठी
जगभरात 15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक
हस्तस्वच्छता दिन’ म्हणून साजरा केला जातो.
त्यानिमित्ताने हा विशेष लेख..
आपल्याकडे संतांनी देहाला मंदिर म्हटले आहे आणि
आत्म्याला परमेश्वर; पण हे शरीर निरोगी असेल
तरच त्या देहाचे मंदिर होऊ शकते. आजच्या भाषेत
सांगायचे तर आयुष्य चांगले आणि निरोगी जगायचे
असेल तर स्वच्छता महत्त्वाची आहे. त्याची
सुरुवात हातांच्या स्वच्छतेपासून व्हायला हवी.
कारण बहुतांश वेळा रोगांचे आजारांचे जंतू हे
हातातूनच पोटात जातात. त्यामुळे रोगजंतूंपासून
स्वतःचा बचाव करायचा असेल तर हात स्वच्छ
धुण्याची आवश्यकता आहे. हात स्वच्छ धुतल्याने
शरीर निरोगी राहते. याच प्रेरणेतून जागतिक
स्तरावर हस्तशुद्धीची मोहीम सुरू झाली.
आपल्याकडे प्राचीन आयुर्वेदात मुखाचे आरोग्य
चांगले असेल तर एकूण आरोग्य चांगले राहते, असे
म्हटले आहे. कारण, पाणी किंवा आहार हा
तोंडावाटेच पोटात जातो; पण आता बदलत्या
हवामानात ज्या हाताने आपण तोंडात घास घालतो
ते स्वच्छ असणे ही पहिली पायरी मानली आहे
. 2008 मध्ये स्टॉकहोम शहरात जागतिक पाणी
सप्ताहाची परिषद भरली होती. तिथून हस्तशुद्धी
मोहिमेचा श्रीगणेशा झाला. यात सामान्य जनतेचा
सहभाग असण्याची गरज आहे. त्यासाठी व्यापक
प्रबोधन आवश्यक आहे. त्यासाठीच 15 ऑक्टोबर
हा जागतिक हस्तशुद्धी दिन म्हणून साजरा केला
जातो. 2008 मध्ये तो पहिल्यांदा पाळण्यात आला.
शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये हाताच्या स्वच्छतेचे बीज
रुजवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. कारण
, लहान मुलांमध्ये मुळातच स्वच्छतेबाबत फारशी
जागरुकता नसते. मातीतले खेळ, भटकणे,
अस्वस्छतेची जाण नसणे यामुळे मुलांमध्ये
स्वच्छतेच्या अभावामुळे होणारे आजार मोठ्या
प्रमाणावर दिसून येतात. याचे मूळ कारण म्हणजे मुले
अन्न खाताना हात स्वच्छ धुवत नाहीत. त्यामुळेच
बहुतांश शाळकरी मुलांमध्ये हगवणीसारखे पोटाचे
विकार अधिक प्रमाणात होताना दिसतात. ते
टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली गेली.
जगभरात हात स्वच्छ न धुता अन्नग्रहण केल्यामुळे
पोटामध्ये विविध जंतू जाऊन होणार्या आजारांमुळे
दरवर्षी 35 लाख मुले दगावतात, असे काही
अभ्यासकांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे
अतिशय सोप्या स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना
पटवून दिले गेले. हात स्वच्छ असतील तर श्वसनाचे
विकार आणि पचनाचे विकार यांचे प्रमाण कमी होते.
त्यामुळे गरीब आणि विकसनशील देशांत याचा
प्रसार करण्यासाठी ‘युनिसेफ’ने खूप उपक्रम राबवले.
त्यातून 2008 हे आंतरराष्ट्रीय स्वच्छता वर्ष म्हणून
घोषित केले गेले. त्याचाच एक भाग म्हणून 15
ऑक्टोबर हा जागतिक हस्तस्वच्छता दिन सुरू
झाला. मुळातच हात व्यवस्थित धुण्याची प्रक्रिया
साधीशी आहे. ती समजून घेऊन तशी सवय लहान
वयातच अंगी बाणवली तर मोेठेपणी त्याचा
निश्चितच फायदा होतो. अर्थात, लहानांबरोबर
मोठ्यांनी स्वच्छ हात धुण्याची सवय अंगीकारली
पाहिजे.
विशेष माहिती साठी खालील बटनांना क्लीक करा